पान टपरीजवळ बसलेल्या दोघांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा मृत्यू
पान टपरीजवळ बसलेल्या दोघांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
नागपूर (भ्रमर वृत्तसेवा) :- येथे पान टपरीजवळ बसलेल्या दोन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाणेअंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. कारमध्ये बसून आलेल्या सात ते आठ अज्ञात हल्लेखोर धारदार शस्त्राने हल्ला करुन पळून गेले.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. राकेश मिश्रा (वय 27) आणि रवी जयस्वाल (वय 28,  दोघेही रा. राजीवनगर, हिंगणा रोड, नागपूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मात्र खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. दोघेही या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते, अशी माहिती आहे.
दररोज सायंकाळी ते बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. रात्री पण तिथे बसून असताना काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंडाला ओढणी बांधलेली होती. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी दोघांवर धारदार हत्याराने सपासप वार केले. राकेश हा जखमी होऊन जागीच कोसळला.  तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला. त्याने काचेची केबिन आतून बंद करुन घेतली. आरोपी त्याचा पाठलाग करत तेथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टरांसमोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि कारमध्ये बसून फरार झाले.

दरम्यान एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार भीमा नरके आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी रवी जयस्वालला लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला. हे मात्र समजू शकले नाही. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
 

nagpur |
इतर बातम्या
Join Whatsapp Group