मुख्यमंत्री शिंदे यांचा नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांनी अडवला रस्ता
मुख्यमंत्री शिंदे यांचा नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांनी अडवला रस्ता
img
दैनिक भ्रमर

नाशिक - राज्यामध्ये सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा राग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज नाशिक दौऱ्यामध्ये सहन करावा लागला. आंगणवाडी सेविकांनी शिंदे यांच्या ताफ्यात शिरत त्यांचा रस्ता अडवला. दरम्यान, या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, काही काळ यामुळे गोंधळ उडाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसापासून आंदोलन करीत आहेत. पण या आंदोलनाकडे सरकार खूप काही गांभीर्याने बघत नाहीये आतापर्यंत फक्त चर्चेच्या फेऱ्या होत आहेत असा आरोप त्यांनी केला. पण प्रत्यक्षात मार्ग मात्र काही निघत नाही या सर्व रोषाला आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामोरे जावे लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक मध्ये युवक संमेलनाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी नाशिकला आले होते. या निमित्ताने त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली.

ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तपोवन मैदान येथे पोहोचले आणि प्रत्यक्ष ग्राउंड मध्ये जाऊन पाहणी करायला लागले त्यावेळी पहिल्यापासूनच या ठिकाणी उपस्थित असलेली अंगणवाडी सेविका राणी सोमनाथ मुतडक व त्यांची एक साथीदार अचानक मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आल्या आणि मुख्यमंत्र्यांचे पाय धरून आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणाबाजी करू लागल्या.

त्या रडूही लागल्या त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अधिकाऱ्यांनी या महिलांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महिलांशी चर्चा करून त्यांना तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील थोडा धीर धरा असे सांगितले.

पोलिसांनी या दोन्हीही अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. अचानक झालेल्या या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group