कल्याण लोकसभा मतदारसंघाची मला चिंता नाही. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहेत. तसेच ही निवडणूक महायुतीचे पदाधिकारी आणि जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या सर्वात विक्रमी मतांनी डॉ. श्रीकांत शिंदे विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो, पण असा उत्साह आणि अशी गर्दी कुठेही पाहिली नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीकरांच्या उत्साहाचे कौतुक केले. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले होते.
यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबतच डोंबिवलीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी कल्याण लोकसभेत यंदा सगळे रेकॉर्ड मोडणार, असे म्हणत गुलाल उधळायला मी स्वतः येणार असल्याचे सांगितले.
कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज डोंबिवलीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यानिमित्ताने यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारात सहभागी झाले. नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. यानंतर पी अँड टी कॉलनी, पांडुरंग वाडी, गावदेवी मंदिर चौक, मानपाडा रोड, संत नामदेव पथ, गोग्रासवाडी, सांगर्ली, आजदे गाव असे मार्गक्रमण करत कावेरी चौकात या भव्य रॅलीची सांगता झाली. विशेष म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रॅलीतील कार्यकर्त्यांची गर्दी तसूभरही कमी झाली नव्हती.
डोंबिवलीकरांनी ठिकठिकाणी या रॅलीचे अतिशय जल्लोषात, उत्साहात स्वागत केले. हे स्वागत आणि उत्साह पाहून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात मागील १० वर्षात केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. तसेच २० मे रोजी सकाळपासून मोठ्या संख्येने मतदान करून १० वर्षात झालेल्या विकासाची पोचपावती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 'श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत' असे म्हणत यंदा सगळे रेकॉर्ड मोडा, गुलाल उधळायला मी सुद्धा येईन, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या रॅलीला कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे मंत्री संजय बनसोडे, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, माववळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, उपनेते अर्जुन खोतकर, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाप्रमुख नाना सूर्यवंशी, लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, भाजपा जिल्हा महासचिव नंदू परब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.