शाळांमध्ये मराठी भाषेसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय ; वाचा
शाळांमध्ये मराठी भाषेसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय ; वाचा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी’, असं आपण अभिमानाने बोलतो. पण तरीही ‘आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ असं म्हणण्याची नामुष्की ओढवण्याची वेळ आज आली आहे. मराठी भाषा प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजू व्हावी, तिच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर निर्माण व्हावा, निदान महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तरी मराठी भाषा समजावी, या हेतून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता गुणांकन पद्धतीने मराठी भाषा विषयाच्या परीक्षेचे मूल्यांकन केले जाणार आहे. 

मराठी भाषेचे श्रेणी स्वरूपात मूल्यांकन होत असताना इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून मराठी भाषा सक्तीच्या अंमलबजावणी संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिल 2020 रोजी शिक्षण विभागाकडून मराठी भाषा सर्व माध्यमातील शाळांमध्ये सक्तीची करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला होता. 2020-21 पासून राज्यभरातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात पाऊल टाकण्यात येत आहेत.

मराठी भाषा विषयात विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार

2020-21 या काळामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियमित शाळा होत नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा सोडून इतर मंडळाच्या शाळांमध्ये 2022-23 आठवीची बॅच, 2023-24 नववीला आणि 2024-25 दहावीला गेलेल्या बॅचसाठी विशेष सवलत म्हणून मराठी भाषा विषयाची मूल्यांकन श्रेणी पद्धतीने करण्यात यावे अशा प्रकारे सूचना देण्यात आल्या होत्या. 

मात्र ही सदर सवलत ही त्या बॅच पुरतीच मर्यादित असल्याने 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून श्रेणी पद्धतीने मराठी भाषा विषयाचे मूल्यांकन न करता सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये गुणांकन पद्धतीने मूल्यांकन केले जावे, असा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. 

त्यामुळे आता मराठी भाषा विषयाची परीक्षा श्रेणी पद्धतीने होणार नसून मराठी भाषा विषयात विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.

मराठी भाषा विषयाचे अध्ययन आणि अध्यापन गांभीर्याने होत नसल्याचे आलं निदर्शनास

राज्य मंडळाच्या शाळासोबत इतर मंडळाच्या शाळांमध्ये सुद्धा मराठी विषय गांभीर्याने शिकवला जावा त्यासोबत विद्यार्थ्यांनी सुद्धा गांभीर्याने या भाषा विषयाचे अध्ययन करावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आतापर्यंत इतर माध्यमांमधील शाळांमध्ये  मराठी भाषा विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी दिली जायची. मात्र त्यामुळे मराठी भाषा विषयाचे अध्ययन आणि अध्यापन गांभीर्याने होत नसल्याचे निदर्शनास आलं. आता 2025-26  या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषा विषयाची परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना श्रेणी ऐवजी गुण दिले जाणार आहे. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group