मुंबई : इंडिया आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या रात्रीच्या जेवनातही मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असणार आहे. तुतारी, नाशिक ढोलच्या माध्यमातून या नेत्यांचे स्वागत होणार आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या डिनरमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असणार आहे. पुरणपोळी, झुणका भाकर, ते वडा पाव या पदार्थांसह इतर मराठी पदार्थही मेन्यूमध्ये असणार आहेत.
राज्यात 11 जणांची समन्वय समिती
या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. बैठकीत सर्व पक्षांशी समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. एकूण अकरा जणांची ही समिती असणार आहे. कोणत्या विषयावर इंडिया आघाडी भूमिका मांडणार, यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार आहे. तसंच इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भातही चर्चा होणार आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीतील अजेंडा काय असणार?
मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत 'इंडिया लोगो' लॉन्चिंग करण्यात येणार आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील अणि इतर राज्यातील स्थानिक प्रश्न कोणते जाहीरनाम्यात घ्यायचे यावर चर्चा होणार. या बैठकीसाठी हयात हॉटेल मधील 175 खोल्या नेत्यांसाठी बुक केल्या असून विविध राज्यातून 60 ते 65 नेते बैठकीला या राहणार उपस्थित असणार आहेत.
दरम्यान विरोधकांच्या बैठकीआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची 30 ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. या वेळी इंडिया आघाडीच्या बैठकीविषयी महाविकास आघाडीने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.
मुंबईत होणाऱ्या बैठकीचं नेतृत्व ठाकरे गटाकडे
इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष समन्वयाने बैठकीच्या आयोजनाच्या तयारीत लागले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी राष्ट्रवादीकडे
मुंबईत होणाऱ्या बैठकीला देशपातळीवरील विरोधी पक्षांचे नेते येणार आहेत. देशभरातील विरोधी पक्षात असलेले 26 पेक्षा अधिक पक्ष हे या बैठकीला हजर राहणार आहेत, यामध्ये देशातील पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश देखील असणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आली आहे.
नेत्यांच्या डिनरची जबाबदारी ठाकरे गटाकडे
31 ऑगस्टच्या रात्रीपासून भाजपविरोधी इंडिया आघाडीची बैठक सुरू होईल, यासाठी रात्री ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील सांताक्रूझ-कलिना परिसरातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांची डिनर डिप्लोमसी होईल.
नेत्यांच्या लंचची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विरोधी पक्ष आघाडी 'इंडिया'ची बैठक सुरू होईल. या दिवशीच्या नेत्यांच्या लंचची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आली आहे. 1 सप्टेंबरला काँग्रेस पक्षाकडून नेत्यांच्या लंचचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.