राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांची खेळी सुरु असून उद्धव ठाकरे यांनी आत अनेक मोठी मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर पार पडले. या निर्धार शिबीरातून शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, अशी मोठी मागणी यावेळी केली. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ही शिवशाही आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी भाग्यवान आहे. माँ आणि बाळासाहेबांसारखे आईवडील लाभले. त्यांनी माझ्यापाठी तुमच्यासारखी पुण्याई दिली. सत्तेपेक्षा हे किती तरी मोठं भाग्य आहे. सत्ता असल्यावर तिकडे लोक जातात. पण सत्ता नसेल तरीही लोक सोबत राहतात हे महत्त्वाचं. तुम्ही वाघाचे छावे, मर्द आणि शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहेत. त्याचा अभिमान आहे. महाराष्ट्र गरम झाला आहे. रेकॉर्ड ब्रेक. ज्यावेळी उन्हात सभा व्हायच्या, उन्हातान्हाच्या मोर्चात शिवसेनाप्रमुख म्हणायचे, जमीन तापली, सूर्य आग ओकतोय, तुमची डोकी उन्हाने नाही तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी तापली की नाही हे महत्त्वाचे आहे. विचारानेस तापले तरच महाराष्ट्राची दिशा ठरेल. ही दिशा आपण ठरवणार आहोत. गद्दार नाही ठरवणार, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी एक पत्रकार आले होते. ताया झिंकिंग या परदेशी पत्रकार आल्या होत्या. रिपोर्टिंग इंडिया हे त्यांचं पुस्तक माझ्याकडे आहे. त्यांनी म्हटलंय या गोळीबारात जे काही शहीद झाले, हॉस्पिटलमध्ये २५०च्यावर मृतदेह होते. त्या महिलेने मृतदेह पाहिले होते. आज जी मुंबई लुटली जाते, सर्व गुजरात गुजरात… गुजराथ्यांबद्दल राग नाही. दोन जणांवर आहे. नेहरू तेव्हा उघड्या गाडीतून फिरायचे. मराठी माणूस एवढा पिसाळला तेव्हा नेहरूंनाही बंद गाडीतून जावं लागले. तुमची मस्ती नाही चालणार. मराठी माणसासमोर मस्ती नाहीच, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवाजी महाराजांचे नाव कुणी घ्यायचे. संभाजी महाराजांचे नाव कोणी घ्यायचे. अमित शाह रायगडावर आले, त्यांनी सांगितलं महाराजांना महाराष्ट्रापुरतं सीमित करू नका. अहो नाहीच आहे. त्याकाळात व्हॉट्सअप नव्हते. महाराजांच्या सुरतेच्या लुटेची बातमी लंडन गॅझेटमध्ये आली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की अमित शाह यांनी शिवाजी महाराजांवर ५०० पानांचं पुस्तक लिहिलंय. ते वाचलं तर संजय राऊत यांना चक्कर येईल असं पाटील म्हणाले. पण हे बोलल्यानंतर पाटील म्हणाले पुस्तक लिहिलं. आणि पाटलांनाच चक्कर आली. अमित शाह आणि पुस्तक लिहिणार? काय बोलताय. काय लिहिताय. यांची विधाने ऐकल्यावर तुम्ही कपाळावर हात मारेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीस यांनी म्हटलं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यावसं वाटतं. तेव्हा त्यांना कुणी तरी सांगितलं की, अहो अमित शाहच शिवाजी महाराजांना एकेरी बोलले. तेव्हा फडणवीस थांबले आणि म्हणाले, आपण लोकशाहीत राहतोय. तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ही शिवशाही आहे. पण हे लोक गुमराह करत आहे. हे राजकारण कोणत्या दिशेला जात आहे. त्यापेक्षा आपल्याला कोणत्या दिशेला नेलं जात आहे., असेही त्यांनी म्हटले.
भाजपची वाटचाल पाहिली तर खूप खोलात जाता येईल. मी काही काँग्रेसच्या वतीने बोलायला आलो नाही. मोदी म्हणतात काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावं. काँग्रेसचे सकपाळ म्हणाले, असं असेल तर संघाने संघाचा दलित अध्यक्षव करून दाखवावा. करा ना. स्पर्धा सुरू करा. संघाचे सर्व अध्यक्षव कोणत्या जातीचे आणि काँग्रेसचे कोणत्या याची लिस्ट करा जाहीर. दाखवा. शिवाजी महाराज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. तुम्हाला खरोखर आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. फक्त मतांसाठी शिवाजी महाराज की जय म्हणू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.