दैनिक भ्रमर : हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका साकार करणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दु:खद निधन झाले. सोमवारी मुंबईतील ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अच्युत पोतदार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आमिर खानच्या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार, मागील काही दिवसांपासून अच्युत पोतदार हे आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते आणि रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अच्युत पोतदार यांचे साधे राहणीमान आणि उत्तम अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. १९८० मध्ये रिलीज झालेल्या 'आक्रोश' हिंदी सिनेमातून चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. त्यांनी हिंदी चित्रपटांसोबत मराठी चित्रपट, नाटक, जाहिराती आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांचे परिंदा, दामिनी, फरारी की सवारी, दबंग 2 हे हिंदी चित्रपट खूप गाजले. तसेच नवरी मिळे नवर्याला, ये रे ये रे पैसा हे मराठी चित्रपट त्यांनी केले आहेत.
अच्युत पोतदार यांनी अमिता का अमित, माझा होशील ना या मालिकांमध्ये काम केले आहे. अच्युत पोतदार यांनी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांचा 3 इडियट्स या चित्रपट खूप गाजला. चित्रपटात त्यांनी प्रोफेसरची भूमिका साकारली होती. सिनेमात त्यांनी आमिर खानसोबत काम केले. 2009 साली '3 इडियट्स' प्रेक्षकांच्या भेटीला आला. 3 इडियट्समधील त्यांचा "अरे कहना क्या चाहते हो.." हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला.