राज्यभरात सध्या विविध ठिकाणी हवामानाची वेगवेगळी परिस्थिती आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून शहरांवर धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामानामध्ये पाऊस सदृश्य परिस्थिती झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आज हवामान विभागाने राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जालना जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात पाऊस कोसळू शकतो तर 27 आणि 28 तारखेला जालना जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या कालावधीत गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याशिवाय नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आलं आहे. तसेच हवामान विभागाने आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अस देखील सांगितलं आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील पिकांची योग्य काळजी घ्यावी.
दरम्यान, धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असूनही पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून संपूर्ण धुळे शहर धुक्याच्या कवेत आहे. तर हवामान विभागाने धुळ्याला देखील पावसाचा इशारा दिला आहे.
त्यानुसार आता 27 आणि 28 डिसेंबरला धुळ्यात ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र आता यामुळे शेतकरी देखील धास्तावला असून रब्बी पिकं धोक्यात आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यात ढगाळ वातावरण असल्याने रब्बी पिकांवर कीड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करण्याच्या सूचना हवामान विभागाने वर्तवल्या आहेत.