राज्याच्या राजकीय वर्तुळात हनी ट्रॅपने मोठे वादळ उठले आहे. नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण विधिमंडळात गाजलं आणि संपूर्ण राज्यात हनी ट्रॅपची चर्चा सुरु झाली. या हनी ट्रॅपमध्ये नेमके मंत्री आणि बडे अधिकारी कोण हा सवाल प्रत्येकालाच पडला आहे. महायुती सरकारचा पायाच हनी ट्रॅपवर असल्याचा घणाघाती आरोप विरोधकांडून करण्यात येत आहे. काही आमदार, खासदार आणि बड्या अधिकाऱ्यांच्या ‘रासलीला’ या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे.
एसीपीकडून लैंगिक अत्याचार, पीडितेची तक्रार
या वादात आता करुणा मुंडे यांनीही उडी घेतली आहे. एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अनेक गौप्यस्फोट केले आहे. एका एसीपी अधिकाऱ्याचा फोटो दाखवत या पीडित महिलेने खळबळजनक आरोप केले आहेत. या अधिकाऱ्याने मोबाईल नंबर घेत मॅसेज केले. पोलीस ठाण्यात चहा घ्यायला बोलावले. या अधिकाऱ्याच्या बायकोने फोनवरून घरी चहा प्यायला बोलावले. तिथे त्यांची बायको नव्हती. तर अधिकाऱ्याने पाण्यात गुंगीची गोळी टाकून मला बेशुद्ध केले. माझ्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप महिलेने केला आहे. मी दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेली. पण अधिकारीच तिथला असल्यामुळे तिथे कोणीच तक्रार घेतली नाही. वरिष्ठांकडे धाव घेतली पण तिथेही कोणी दखल घेतली नाही. पोलीस महासंचालक, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केल्यावर चौकशीला बोलावण्यात आले. पुरावे दिले. पण पोलिसांनी मलाच धमकावले असा आरोप पीडितेने केला. माझ्या पेनड्राईव्ह मध्ये पुरावे आहेत. मात्र माझ्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे पीडितेने म्हटले आहे.
हनी ट्रॅप करतात मन भरलं की हे ट्रॅप वाटतं
करुणा मुंडे यांनी या पीडितेवर अन्याय करणाऱ्या पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. हनी ट्रॅप मध्ये आमदार खासदार अधिकारी असणार. हनी ट्रॅप करतात मन भरलं की त्यांना हे ट्रॅप वाटत. 6 महिन्यापासून ही महिला फिरतेय. महिला कैद्यांवर तुरुंगात सुद्धा अत्याचार होत असल्याचे कोणीतरी मला पाठवलं आहे. अनेक महिलांवर असे अन्याय होत आहे. पण त्यांना कोणी न्याय देत नाही. प्रत्येकाचे हात दगडाखाली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या. येत्या 8 दिवसांत जर गुन्हा दाखल नाही झाला तर मी डीसीपी ऑफिसला आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.