भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी कराराची अचानक घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही शेजारी देशांसोबत काम करण्याची ऑफर दिली आहे.
केंद्र सरकारने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर भर दिलाय. तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध केला आहे. ट्रम्पच्या ऑफरवर भारत सरकार काय प्रतिक्रिया देते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 86 तासांच्या संघर्षानंतर अखेर शस्त्रसंधी करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनंतर याबद्दल घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरसंदर्भात तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांसोबत काम करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत X हॅंडलवर लिहिलंय की, मला भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा खूप अभिमान आहे. कारण त्यांच्याकडे समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि संयम आहे.
सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू आणि विनाश होऊ शकतो. लाखो चांगल्या आणि निष्पाप लोकांना मारले जाऊ शकते. तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा खूप वाढला आहे.
या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिका तुम्हाला मदत करू शकली याचा, मला अभिमान आहे. जरी याबद्दल चर्चा झाली नसली तरी, मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत व्यापार लक्षणीयरीत्या वाढवणार आहे. शिवाय हजारो वर्षांनंतर काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का, हे पाहण्यासाठी मी तुम्हा दोघांसोबत काम करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या कामासाठी देव आशीर्वाद देवो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.