लाइव्ह शो दरम्यान प्रेक्षकांकडून कलाकारांबाबत बऱ्याचदा नको नको त्या कमेंट्स केल्या जातात. ज्यामुळे या कलाकारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आता देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे.
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका निशा उपाध्याय तिच्या लाइव्ह स्टेज शोजसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, बिहारमधील सारण जिल्ह्यात आयोजित तिच्या एका स्टेज शो दरम्यान, एका अँकरनं केलेल्या अत्यंत खालच्या दर्जाच्या टिप्पणीमुळं निशाचा संयम सुटला आणि तिनं भर कार्यक्रमात अँकरवर चप्पल उगारल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं ?
निशा उपाध्याय एका कार्यक्रमात स्टेजवर गाणं गाण्यासाठी आली होती. तिचा परफॉर्मन्स सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाचा सूत्रसंचालक मुकेश नावाच्या व्यक्तीनं प्रेक्षकांसमोर निशाच्या मानधनावरून आक्षेपार्ह विधान केलं. "आज दीदींचा रेट काय आहे? एका गाण्याचे १० हजार, दोन गाण्यांचे २० हजार की आणखी काही?" अशा शब्दांत त्यानं निशाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
अँकरनं वापरलेला 'रेट' हा शब्द आणि त्याचा रोख पाहून निशा प्रचंड संतापली. तिनं तात्काळ आपली सँडल काढली आणि अँकरला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली. व्हायरल व्हिडिओमध्ये निशा उपाध्याय अत्यंत संतप्त दिसत आहे. ती ओरडताना ऐकू येते की, "हा माझा रेट ठरवणारा कोण? मला माईक द्या, याचा रेट मी आज सगळ्यांना सांगते." या सगळ्यामुळं स्टेजवर एकच गोंधळ उडाला. तिच्या सोबत असलेल्या टीम मेंबर्सनी देखील अँकरच्या या वागणुकीचा निषेध केला आणि त्याला स्टेजवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.