
गायन क्षेत्रातून एक दुःखद घटना समोर आली आहे. लोकप्रिय डेथ मेटल बँड 'अॅट द गेट्स'मधील प्रसिद्ध स्वीडिश गायक टॉमस लिंडबर्ग यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी टॉमस लिंडबर्ग यांची प्राणज्योत मालवली. बँडच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे मंगळवार, १६ सप्टेंबरला बातमी देण्यात आली.
२०२३ मध्ये टॉमस लिंडबर्ग यांनी त्यांच्या तब्येतीबाबत मोठा खुलासा केला होता. मला एका विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे त्यांनी सांगितले होते. हा कर्करोग ग्रंथींना प्रभावित करणारा कर्करोगाचा एक दुर्मिळ प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मार्च २०२५ मध्ये एका वैयक्तिक निवेदनामध्ये टॉमस यांनी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या तोंडाचा एक भाग काढून टाकला असल्याची माहिती दिली होती. या उपचारानंतर ते दोन महिने रेडिएशन थेरपी घेत होते.टॉमस लिंडबर्ग यांना 'टोम्पा आणि 'गॉटस्पेल' या नावांनीसुद्धा ओळखले जाते.
'कर्करोगाच्या उपचारांशी संबंधित गुंतागुंतींमुळे आज (१६ सप्टेंबर) सकाळी टॉमस यांचे निधन झाले आहे. वैद्यकीय प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाही. टॉमस उदारतेसाठी आणि सर्जनशील भावनेसाठी तुला नेहमीच लक्षात ठेवले जाईल. आमच्या हृदयात तुम्ही कायम असाल', असे बँडने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आहे.