मुंबईनजीकच्या नायगावमध्ये १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नायगावमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , खेळताना तोल गेला आणि चिमुकली आईच्या डोळ्यासमोर खाली पडली. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
नवकार फेस-१ ही १४ मजल्यांची सोसायटी आहे. या सोसायटीमधील एका बिल्डिंगच्या १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. अनविका प्रजापती असं मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव होते. नावकार सोसायटीतील बी- 2 मध्ये ही चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.
नेहमीप्रमाणे चिमुकली घराच्या समोरील गॅलरीत खेळत होती. गॅलरीत चप्पलचा स्टॅण्ड ठेवला होता. त्यावर चढून ही मुलगी खेळत होती. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती १२ व्या मजल्यावरून खाली पडली. आईच्या डोळ्यासमोर ही मुलगी खाली पडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला तात्काळ वसईतील महापालिकेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
नायगावमधील नवकार सोसायटीमध्ये १४ मजल्यांचे टॉवर असतानाही त्या टॉवरच्या गॅलरीला सुरक्षात्मक ग्रील नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे नवकार सोसायटीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा सध्या पोलिस तपास करत आहेत.