मुंबई : अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या आजुबाजूला अनेक लोक उपस्थित होते. या व्यक्तींचे जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरु असताना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून प्रत्यदर्शींपैकी एका साक्षीदाराला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी आता संबंधित प्रत्यक्षदर्शीने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. या अज्ञात व्यक्तीने साक्षीदाराला धमकावत त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला देण्यात आली. हा फोन लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आता पोलीस साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.