बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणारा शूटर कसा सापडला?   वाचा सविस्तर
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणारा शूटर कसा सापडला? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर तब्बल महिनाभरानंतर मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय. या प्रकरणात पोलिसांनी  सिद्दीकी यांच्या गोळीबार करणाऱ्या मुख्य शुटरला उत्तर प्रदेशातील बहारिचमधून अटक केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी मुंबई पोलीस आणि यूपी एसटीएफला मोठं यश हाती लागलं आहे. या संयुक्त पथकाने फरार शूटर शिवकुमारला अटक केली आहे. आरोपी शिवकुमार यूपीच्या बहराइचमार्गे नेपाळला पळण्याच्या तयारीत होता. मुंबईत हत्या केल्यानंतर तो आधी पुण्याला गेला, त्याठिकाणाहून झाशीमार्गे लखनौला पोहचला होता. शिवकुमारला मदत करणाऱ्या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने हत्येबाबत एक एक प्लॅन उघड केला आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या करून घटनास्थळावरून तिघे फरार झाले होते. त्यातील शिवकुमारचं लोकेशन ट्रॅकिंग पोलिसांनी ठेवले होते. घटनेनंतर तो मुंबई, पुणे आणि त्यानंतर झाशीला रवाना झाला. तिथून लखनौला पोहचला त्यानंतर बइराइच इथं सुरक्षित ठिकाणी लपून बसला होता. आरोपी शिवकुमार नेपाळला पळून जाण्याची तयारी करत होता मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

याबाबत यूपी पोलिसांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांनी सांगितले की, नेपाळपासून १५० किमी अंतरावर बहराइच येथून शिवकुमारसह त्याच्या ४ साथीदारांना अटक केली. खबऱ्यांकडून पोलिसांना शिवकुमारची टीप मिळाली होती. शूटर शिवकुमारचं लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईशी संपर्क झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी १० लाख रुपये आणि दर महिन्याला काही रक्कम देण्याचं आरोपीला ऑफर दिली होती.

शिवकुमार मजुरी करण्यासाठी महाराष्ट्रातील पुण्यात आला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात त्याने धर्मराज कश्यप याला बोलावून घेतले होते. शिव आणि धर्मराज बइराइच जिल्ह्यातील कैसरगंजच्या गंडारा गावातील रहिवासी होते. शिवकुमारचे वडील बालकृष्ण मजूर होते. बाबा सिद्दीकी हत्याकांडात धर्मराज कश्यप आणि गुरमेल बलजित सिंह याला घटनास्थळी अटक करण्यात आली होती.

शिवकुमारने तपासात सांगितले की, पुण्यातील एका भंगार दुकानात तो काम करत होता. त्याचे दुकान आणि शुभम लोणकर दुकान आजूबाजूला होते. शुभम लोणकर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करायचा.

अनेकदा त्याचे लॉरेन्सचा भाऊ अनमोलशी बोलणे झाले होते. बाबा सिद्दीकी हत्येबदल्यात १० लाख रुपये आणि दर महिना काही ना काही रक्कम मिळेल असं शिवकुमारला सांगण्यात आले होते.

हत्येसाठी काय काय केलं?

जबाबानुसार, शुभम लोणकर आणि मोहम्मद यासीन अख्तर यांनी हत्येसाठी हत्यार, कारतूस, एक मोबाईल फोन आणि सिम कार्ड दिले. हत्येनंतर तिन्ही गुन्हेगारांना एकमेकांशी बोलण्यासाठी नवीन सिमकार्ड आणि मोबाईल फोन देण्यात आले. हत्येच्या आधी आणि हत्येनंतर वेगवेगळे सिमकार्ड आणि मोबाईल फोन दिले होते. मागील काही दिवसांपासून शूटर्स मुंबईत रेकी करत होते. बाबा सिद्दीकी हत्येनंतर तिन्ही शूटर वैष्णोदेवी इथं एकत्र जाणार होते. मात्र घटनास्थळी दोघांना पकडल्यानंतर प्लॅनमध्ये बदल करण्यात आला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group