जालना : जालनामध्ये भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जालन्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जालना पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात परप्रांतीय दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील इतर ५ जण जखमी झालेत.
या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये जी. रामू (वय ४५ वर्षे) आणि जी. माधुरी (वय ४० वर्षे) या दाम्पत्याचा समावेश आहे. हे दोघेही हैदराबादचे रहिवासी होते. हैदराबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामधील ५ जण जखमी झाले. मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.
अपघाताची माहिती मिळताच, जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या ५ जणांना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गु्न्हा दाखल केला आहे.