राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत . दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
मनसेचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे संपन्न झाली. या बैठकीत मनसेची विधानसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती, उमेदवारांची निवड आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. याच बैठकीत स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करतानाच पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, असे मत अमित ठाकरेयांनी मांडले.
आपल्या पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदीय राजकारणात असणे महत्त्वाचे आहे, असे सांगून स्वत: निवडणुकीला इच्छुक असल्याचे अमित ठाकरे यांनी भर बैठकीत सांगितले. अमित ठाकरे यांच्या घोषणेनंतर ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.