मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांचा नावाचा आणि आवाजाचा दुरुपयोग करून पुण्यातील एका व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता आमिर खानची फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , अली अमानत शेर असं या आरोपीचं नाव आहे. गंभीर बाब म्हणजे हा आरोपी आमिरला फोन करून मी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले बोलतोय, असं सांगायचा आणि इतर लोकांना त्याच्याकडे भेटायला पाठवत होता. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर अली अमानत शेर अ याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तापस करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
सुरुवातीला या आरोपीने आमिरचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर आमिर खान याला आपण सातऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असल्याचं सांगायचा. त्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करून त्यानं आमिरची फसवणूक केली.
'मी सातरहून उदयनराजे भोसले भोसले बोलतोय, माझे काही लोक तुम्हाला भेटायला येतील, त्यांची मदत करा' असं हा आरोपी फोनवर सांगायचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता, असं समोर आलंय.
आमिरच्या मनात संशय आल्यानंतर त्यानं उदयनराजे भोसलेंचे निकटवर्तीय असलेले पंकज चव्हाण यांना संपर्क साधला. यानंतर पंकज चव्हाण यांनी या आरोपीसोबत फोनवर संवाद साधला आणि धक्कादायक तितकाच गंभीर प्रकार समोर आला. पंकज चव्हाण यांच्याशी बोलताना आरोपीनं आपण उदयनराजे भोसले असल्याचं भासवलं. यानंतर हा प्रकार समोर आलाय.
आमिरची फसणूक समोर आल्यानंतर तातडीनं पोलिसांची मदत घेण्यात आली. आरोपी अली अमानत शेख याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.