मुंबई : यंदा माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे आज उमेदवारी भरणार आहेत. अमित ठाकरे मीनाताई ठाकरे पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला अभिवादन करतील, अशी माहिती समोर आली आहे. अमित ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात देखील केली आहे. याचदरम्यान त्यांच्या एका विधानाची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
अमित ठाकरेंनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. मी आजारी होतो तेव्हा मला माहित होतं की, माझे वडील काय आहेत या फोडाफोडीचा त्यांना काही फरक पडणार नव्हता आणि ते पुढे काय करू शकतात हेही मला माहीत होतं. पण त्यावेळी नैतिकता पाळली गेली नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.
आता ते बोलतात की, मी आजारी असताना माझे 40 आमदार फोडले, तेव्हा मी आजारी असताना तुम्ही सहा नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला तुमची चूक दिसली नाही का?, असं अमित ठाकरे म्हणाले. तसेच दोन भाऊ एकत्र यावे हे जे मला अगोदर वाटत होतं ते या प्रकारानंतर पूर्णपणे माझ्या डोक्यातून निघून गेलं, आता मला तसं अजिबात वाटत नाही. तो विषय माझ्यासाठी तरी संपलेला आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले.