भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी आरसीबीच्या रजत पाटीदार याला स्थान दिले आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी सरफराज खान याच्या नावाचीही चर्चा होती. पण रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. सरफराज खान इंडिया अ संघासोबतच राहणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदार भारतीय संघासोबत जोडला आहे. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, रजत पाटीदार हैदराबादमध्ये भारतीय संघासोबत जोडला आहे. गेल्य काही दिवसांतील शानदार फॉर्मुळे रजत पाटीदार याला संधी मिळाली आहे.
मध्यप्रदेशकडून खेळणाऱ्या रजत पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. त्याने आतापर्यंत 55 फर्स्ट क्लास सामन्यात 46 च्या जबरदस्त सरासरीने 4 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 22 अर्धशतके आहेत. रजत पाटीदार भारताच्या अ संघाचा सदस्यही आहे. त्याने नुकताच इंग्लंड लॉयन्सविरोधात 151 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 50 धावांत सहा विकेट गमावल्या तेव्हा रजतने 151 धावांची खेळी केली.