भारताला टी-20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड हे अगामी आयपीएलच्या हंगामात शाहरुख खानच्या केकेआर संघाशी जोडले जाऊ शकतात. केकेआर संघाने द्रविड यांना मेंटॉर म्हणून संघात सामील होण्याची ऑफर दिली आहे.
राहुल द्रविड यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर केकेआर व्यवस्थापनाने द्रविड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त आहे. केकेआर व्यतिरिक्त इतर फ्रँचायझींही द्रविड यांना आपल्या संघात घेण्यास इच्छूक असल्याचे समजते आहे.
टी-20 विश्वचषकाच्या मेगा-इव्हेंटनंतर भारतीय क्रिकेट संघ आता या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत सुरू होणाऱ्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमण हे या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत.
टीम इंडियाने राहुल द्रविड यांच्या कोचिंगखाली टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. भारतीय संघ यापूर्वी 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. येथे संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. द्रविड यांना कोचिंगचा खूप अनुभव आहे. जर ते केकेआरमध्ये सामील झाले तर खेळाडूंना त्याचा खूप फायदा नक्कीच होईल.
गंभीरच्या पुनरागमनानंतर केकेआरची कामगिरी चांगली झाली. संघाने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले. कोलकाताने फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. 14 लीग सामन्यातील 9 सामने जिंकले तर 3 सामने हरले. आता गंभीर केकेआरला अलविदा करून द्रविड यांची जागा घेण्याची शक्यता आहे. तर द्रविड हे केकेआरशी जोडले जाऊन गंभीरची जागा घेण्याचा अंदाज आहे.