आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला १ जूनपासून प्रारंभ झाला आहे. यावेळी ही स्पर्धा वेस्टइंडिज आणि अमेरिकेत खेळवण्यात येत आहे. स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने अमेरिकेत पार पडले. आता स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांचा थरार वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान अमेरिका आणि वेस्टइंडिज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. सुपर ८ फेरीसाठी ८ संघ ठरले आहेत.
भारतीय संघ
भारतीय संघाने या स्पर्धेत दमदार खेळ करुन दाखवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेत ४ सामने खेळले. या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवला. तर १ सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हता कारण ती खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नव्हती. मात्र वेस्टइंडिजच्या खेळपट्ट्या या फलंदाजीसाठी अनुकूल असतील. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत चॅम्पियनसारखा खेळ करुन दाखवला आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा एक सामना भारतीय संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. ऑस्ट्रेलियालाही सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
अफगाणिस्तान -
अफगाणिस्ताननेही सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाला शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र हा संघ गोलंदाजीच्या बळावर कुठल्याही बलाढ्य संघाला पाणी पाजू शकतो.
बांगलादेश
बांगलादेशचा संघ या स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश करेल असा कोणीच विचार केला नव्हता. कारण या संघाला टी-२० मालिकेत अमेरिकेकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या संघाकडून हुसेने दमदार खेळ करुन दाखवला आहे. बांगलादेश संघाला या गोलंदाजाकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
इंग्लंड
इंग्लंडचा संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत दाखल झाला होता. मात्र पावासामुळे इंग्लंडचा खेळखंडोबा झाला. कसाबसा इंग्लंडचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. आता इथून पुढे इंग्लंडचा संघ सेमीफायनलमध्येही दाखल होऊ शकतो.
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या सुपर ८ मध्येही प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचे पुढील सामने वेस्टइंडिजमध्ये होणार आहेत. इथे फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने फलंदाज मोठे फटके खेळताना दिसून येऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेचा संघही सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
वेस्टइंडिज
यंदाच्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत यजमान वेस्टइंडिजचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी. दोन्ही क्षेत्रात या संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे वेस्टइंडिजला केवळ सेमीफायनलमध्येच जाण्यासाठी नव्हे तर जेतेपदासाठीही प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
अमेरिका
पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पहिल्याच स्पर्धेत या संघाने सुपर ८ मध्ये स्थान मिळवलं आहे. अमेरिकेचा संघ सुपर कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.