भारताचे पहिले दलित क्रिकेटपटूची कहाणी रुपेरी पडद्यावर!
भारताचे पहिले दलित क्रिकेटपटूची कहाणी रुपेरी पडद्यावर!
img
Dipali Ghadwaje
आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना गुंडाळणारे भारताचे पहिले दलित क्रिकेटपटू बाळू पालवणकर अर्थात पी. बाळू यांचा  जीवनपट आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. बाळू पालवणकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय क्रिकेट चांगलेच गाजवले होते. अस्पृश्यतेचे चटके सोसूनही त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांवर भुरळ पाडली होती.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. बाळू पालवणकरांची भूमिका अजय देवगण साकारणार आहेत की इतर अभिनेता झळकणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही. 

तिग्मांशु धुलिया क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनवणार असल्याचे म्हटले जात आहे. देशातील पहिला दलित क्रिकेटपटू बाळू पालवणकर  आणि त्यांच्या भावांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या 'अ कॉर्नर ऑफ अ फॉरेन फील्ड' या पुस्तकावर आधारित आहे. रामचंद्र गुहा यांनी स्वत: ही माहिती दिली. 

रामचंद्र गुहा यांनी केले ट्वीट

रामचंद्र गुहा यांनी आपल्या ट्विटरवर ट्वीट करत म्हटले की, रील लाईफ एंटरटेन्मेंटने माझ्या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. हे पुस्तक बाळू पालवणकर आणि त्यांच्या भावांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आधारीत आहे. या प्रोजेक्टला तिंग्मांशू धुलिया लीड करणार असल्याने आनंद वाटत असल्याचेही गुहा यांनी सांगितले. 

निर्माती प्रीति सिन्हा यांनीदेखील गुहा  यांचे ट्वीट रिट्वीट करत पुस्तकाचे हक्क बहाल केले असल्याबद्दल आभार मानले आहे. अजय देवगण,  तिग्मांशू धुलिया यांनाही टॅग करण्यात आले आहे.  अजय देवगण या चित्रपटात काम करणार की नाही हे स्पष्ट झाले नाही. 

बाळू पालवणकर कोण होते?

बाळू पालवणकर हे भारतातील पहिले दलित क्रिकेटपटू होते. बाळू पालवणकर यांचा जन्म 1876 मध्ये मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये झाला. बाळू पालवणकर यांचे तिन्ही भाऊ शिवराम, विठ्ठल आणि गणपत हे देखील नावाजलेले क्रिकेटपटू होते. महाराज रणजीति सिंह यांच्याआधी बाळू पालवणकर हे भारतीय क्रिकेट वर्तुळात नावाजलेले क्रिकेटपटू होते असे रामचंद्र गुहा यांनी एका लेखात म्हटले होते. बाळू पालवणकर आणि त्यांचे भाऊ क्रिकेट खेळत असले तरी त्यांना आपल्या संघातही जातीय अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group