नाशिक (प्रतिनिधी) :- येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला. सामनावीर म्हणून सौरभ नवले याला गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात अर्धशतक व दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावले.
दरम्यान प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या संघाने बडोद्यावर विजय मिळवल्याने दुधात साखर मिसळावी त्याप्रमाणे आजचा हा योग नाशिककरांना साधता आला. त्यामुळे घरी जाताना प्रत्येक नाशिककर गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणे नक्कीच गुणगुणत गेला असेल. तत्पूर्वी महाराष्ट्राने कालच्या सातवा 464 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला.
पहिल्या डावाची आघाडी धरून महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी 616 धावांचे आव्हान दिले. बडोद्याची सुरुवात खराब झाली. सलामी वीर शिवालीक शर्मा हा झटपट बाद झाला त्यावेळी एक बाद 16 अशी झाली होती. त्यानंतर ठराविक क्रमाने फलंदाज बाद होत गेले. नाशिकच्या रामकृष्ण घोषने पुन्हा एकदा गोलंदाजीची चमक दाखवत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.
विशेषतः बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्याला दुसऱ्याही डावातही लवकर तंबूची वाट धरायला लावली. रामकृष्ण घोषने 16 धावात दोन गडी बाद केले. बडोदाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले, तसा महाराष्ट्राचा विजय समीप येत गेला. महाराष्ट्राच्या या विजयाने बडोद्याच्या संघ गुणतालिकेवर फरक पडला असून जम्मू-काश्मीर प्रथम स्थानावर पोहोचले आहे. दरम्यान पुन्हा एकदा नाशिकचे अनंत कान्हेरे मैदान महाराष्ट्र संघासाठी फलदायी ठरले.
कृणाल पंड्या व ऋतुराज गायकवाड यांच्याबरोबर सेल्फी काढता यावी किंवा किमान एक सही तरी मिळावी या अपेक्षने नाशिककर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सामना संपल्यानंतरही जवळजवळ दोन तास या खेळाडूंची वाट पहाण्यासाठी थांबले होते. अनेकांनी प्रतीक्षा करूनही त्यांना कृणाल पंड्या व ऋतुराज गायकवाड यांना भेटता न आल्यामुळे नाराज होऊन परतावे लागले.
दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, बडोद्याच्या संघाला आम्ही लवकर बाद करू याचा आम्हाला विश्वास होता. त्यामुळेच तिसऱ्या दिवसापर्यंत आम्ही खेळत राहिलो, डाव घोषित करण्याची घाई केली नाही. आता त्याचा रिझल्ट समोर आहे.
आम्ही त्यांचा दणदणीत पराभव केला. नाशिकचे वातावरण खरच क्रिकेटसाठी चांगले आहे. नागरिक देखील क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे खेळताना आनंद मिळाला असल्याचे ऋतुराज गायकवाड म्हणाला.