मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ऐतिहासिक मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आता एका ऐतिहासिक आणि अत्यंत निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या जीवनातील संघर्षाचे 'क्रांतीपर्व' आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे.
या विशेष टप्प्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार, डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर, यांची मालिकेत धमाकेदार एन्ट्री झाली आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या भागात प्रेक्षकांनी सावित्रीबाई आणि जोतीराव यांचे बालपण, त्यांचा विवाह आणि शिक्षणाविषयीची त्यांची अथांग तळमळ जवळून अनुभवली.
आता ही मालिका एका अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे समाजात खोलवर रुजलेला जातीभेद, अन्याय आणि अंधश्रद्धा यांना छेद देत 'शिक्षण हेच खरे सामर्थ्य' हा विचार रुजवण्यासाठी हे दांपत्य खंबीरपणे उभे राहणार आहे.
या नवीन अध्यायात महात्मा जोतीराव फुले यांची मुख्य भूमिका डॉ. अमोल कोल्हे साकारत आहेत, तर 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
या भूमिकेबद्दल बोलताना मधुराणी गोखले म्हणाल्या की, "सावित्रीबाईंसारख्या युगस्त्रीचे व्यक्तिमत्त्व साकारणे ही मोठी जबाबदारी असून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी मिळाल्याचा आनंद आहे". तर डॉ. अमोल कोल्हे यांनी "महात्मा फुलेंचे धगधगते विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान आणि भाग्य आहे" अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
जगाला समतेचा संदेश देणाऱ्या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या क्रांतीकारकांचा प्रेरणादायी प्रवास आता नव्या ऊर्जेसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही मालिका स्टार प्रवाह वर दररोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित होत असून ती JioHotstar वर देखील पाहता येईल.