बॉलिवूड मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच धुरंधर सिनेमातून घाघवीत यश मिळविणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह याला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता रणवीर सिंहविरोधात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) मोठी कारवाई केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , FWICE ने त्याच्यावर थेट बंदी घातली असून त्याच्याविरोधात असहकाराचा आदेश जारी केला आहे. इतकंच नव्हे संपूर्ण चित्रपटसृष्टीला त्याच्यासोबत काम न करण्यास सांगण्यात आलं आहे. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधीच त्याने अचानक माघार घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रणवीरने अचानक माघार घेतल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. काही दिवसांपासून रणवीर आणि निर्मात्यांमध्ये क्रिएटिव्ह मतभेद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या मतभेदांमुळे रणवीरने शूटिंगपूर्वीच चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.
रणवीरला ‘डॉन’ या भूमिकेचा अधिक डार्क आणि आक्रमक अंदाज हवा होता. मात्र दिग्दर्शक फरहान अख्तरची भूमिका वेगळी असल्याने दोघांमध्ये एकमत होत नव्हतं. यामुळे चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच रणवीरने हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. ‘डॉन 3’ची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननंतर रणवीर सिंह या लोकप्रिय फ्रँचाइझीमध्ये डॉनच्या भूमिकेत दिसणार असल्याने चित्रपट चर्चेत होता. मात्र आता रणवीरच्या एक्झिटनंतर नव्या अभिनेत्याच्या शोधाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फेडरेशनच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट गेल्या तीन वर्षांपासून निर्मितीच्या प्रक्रियेत होता. डॉन 3 या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याचे सहकारी रितेश सिधवानी यांनी रणवीरविरोधात इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर असोसिएशनने पुढील कारवाईसाठी हे प्रकरण फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजकडे पाठवलं. सध्या डॉन 3 च्या वादात FWICE मध्यस्थी करत आहे. या फेडरेशनचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच कलाकार चित्रपट सोडून जाण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.