सासुरवाडीत जावयाला मोठा मान असतो. तो सासुरवाडीत आला की त्याला काय हवं काय नको यासाठी सासुरवाडीच्या लोकांची धडपड सुरु असते. पण अकोल्यातील एका जावयाला सासुरवाडीचा पाहुणचार जीवावर बेतलाय. अकोल्यातुन ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून जावयाचीच हत्या करण्यात आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावामध्ये घरगुती वादातून जावयाची निर्घृण हत्या करण्यात आली. नागेश गोपनारायण असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नागेश बायकोच्या माहेरी अंबाशी गावात आला होता. या ठिकाणी नागेश आणि त्याच्या सासरच्या लोकांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला.
शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. सासरच्या काही नातेवाईकांनी नागेशवर काठ्या, चाकू अन् कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे नागेशचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.