गुजराच्या सौराष्ट्रमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी २० वर्षीय लिव्ह-इन पार्टनर तरूणीची हत्या केल्याचा आरोप एका तरूणावर होता, पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान तो तुरूंगात असतानाच हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झालाय. नरेंद्र सिंह ध्रुवेल असे मृताचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नरेंद्रने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. ही घटना सौराष्ट्रातील एका सिरेमिक कारखान्यातील कामगार वसतिगृहात घडली. आरोपी तरुण आणि पीडित मुलगी गेले कित्येक महिने प्रेमसंबंधात होते. याशिवाय ते एकाच घरात राहायचे, मात्र त्या दोघांनी लग्न केलं नव्हतं. काही कारणास्तव या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणातून आरोपीला राग अनावर झाला.त्याने पीडितेला बेदम मारहाण केली, त्यानंतर क्रूरतेने तिच्या तोंडाचा चावा घेतला. या हाणामारीत तरुणीचा मृत्यू झाला.
या घटनेची पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्र वेगाने फिरवत तरुणाला बेड्या ठोकल्या शिवाय मृत तरुणीचा मृत्यू शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या, तसेच तिचा अमानुष छळ करण्यात आला होता.
या गुन्ह्याची कबुली देताना तरुणाने सांगितलं की, त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणातून त्याने प्रेयसीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. आरोपी तरुणाच्या जबाबानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, गेले कित्येक दिवस शिक्षा भोगत असलेल्या तरुणाला रविवारी पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आला. वेदना जाणवू लागल्याने तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा जागीच अपघाती मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने तुरुंगाच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.