अकोल्यामध्ये रेल्वे स्थानकावर टीसीने मालगाडी समोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या टीसीवर १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अटक करतील या भीतीने या टीसीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार , अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. कौटुंबिक कलाहातून टीसीने टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली. सुमेध मेश्राम असं या आत्महत्या करणाऱ्या रेल्वे टीसीचं नाव आहे. सुमेध मेश्रावर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते.
पोलिस त्यांना अटक करणार होते. पण अटकेच्या भीतीने सुमेध मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. ४० वर्षीय सुमेध मेश्राम हे गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणामुळे तणावात होते. काल रात्री मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी रेल्वे समोर उडी घेतली.
मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास अकोला लोहमार्ग पोलिस करत आहेत.