पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेला, पण 'तो' घरी परतलाच नाही....
पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेला, पण 'तो' घरी परतलाच नाही....
img
Dipali Ghadwaje
आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काबाड कष्ट करत असतो. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना अकोला जिल्ह्यातील सावरगाव परिसरात गुरुवारी (२८ डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली. वैजनाथ वासुदेव डोलारे, असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

 या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत वैजनाथ डोलारे हा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या नायगाव येथील रहिवासी आहे. त्याने अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातल्या सावरगाव येथील शेतशिवारात बटाईने शेती केली होती. या भागात वन्यप्राणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

त्यामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी कुंपण लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास मृत वैजनाथ आपल्या शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेला असता, त्याला विद्युत प्रवाहाचा जबर शॉक लागला.

यामध्ये वैजनाथ याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांनी वैजनाथला बांधवावर पडलेले बघितले आरडाओरड झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. वैजनाथ अत्यंत होतकरू शेतकरी होता. त्याच्या अचानक निघून जाण्याने डोलारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group