जुन्या वादातून मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांना मारल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडलीय. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. गॅस व्यवसायिकासोबत असलेल्या जुन्या वादातून एका टोळीने रिक्षा चालकाची भर रस्त्यात हत्या केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातल्या उड्डाणपुलाखाली घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस व्यवसायाच्या जुन्या वादातून एका टोळीने रिक्षा चालक इम्रान सय्यद शफिक सय्यद याची भर रस्त्यावर क्रूर हत्या केली. इम्रान मुलांसह त्याच्या रिक्षाने घरी जात होता. याच वेळी कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या मुलांसमोरच हाताची बोटे, मान कापून इम्रान सय्यद याची हत्या केली. मे महिन्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीतून पडेगाव मुजीब डॉन नामक गुन्हेगाराने ही हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सादातनगरमध्ये राहणारा इम्रान काल रात्री सायंकाळी त्याच्या चार आणि दहा वर्षाच्या मुलांना घेऊन बाहेर गेला होता. तो घरी परतत असताना उड्डाणपुलाखाली सिल्क मिल कॉलनी परिसरात अचानक सुसाट कारने त्याची रिक्षा अडवली. कारमधून पाच ते सहा जणांनी उतरून इम्रानच्या मुलांना रिक्षाबाहेर काढले. त्यानंतर सीटवर बसलेल्या इम्रानवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.