नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : “येथे लघवी करू नकोस,” असे सांगितल्याचा राग आल्याने एका फिरस्त्या तरुणाने मजुराचा चाकूचे वार करून खून केल्याची घटना वडाळा नाका येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आक्की बंडू गांगुर्डे व मयत बंडू लक्ष्मण गांगुर्डे (वय 35, दोघेही रा. उड्डाणपुलाखाली वडाळा नाका, नाशिक, मूळ रा. बार्हे, ता. सुरगाणा) हे दोघे पती-पत्नी आहेत. ते दोघेही मजुरी करतात. दि. 26 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास फिर्यादी व तिचे पती हे दोघेही उड्डाणपुलाखाली गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी त्यांच्या शेजारीच राहणारा आरोपी जयेश दीपक रायबहादूर हा तेथे आला. तो उड्डाणपुलाच्या खांबाजवळ लघुशंका करू लागला. त्याला फिर्यादीच्या पतीने “येथे लघवी करू नकोस,” असे सांगितले. तेव्हा जयेशला त्याचा राग आला व तो बंडू गांगुर्डे याला शिवीगाळ करून त्याच्याकडील चाकूने छातीवर, पोटावर वार करून पळून गेला. त्यानंतर फिर्यादी आक्की गांगुर्डे व त्यांच्याजवळच पुलाखाली राहणारी गौरी नामक महिला यांनी बंडू गांगुर्डे याला गावठी औषध लावून त्याला चादर पांघरायला देऊन झोपायला सांगितले.
त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी झोपेतून उठले. त्यावेळी जखमी झालेल्या पतीने फिर्यादीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांना झालेल्या जखमांमधून रक्त येत असल्याने फिर्यादीने पुलाखालीच राहत असलेली तिची बहीण मनी व भाऊ गंगाराम यांना बोलावून घेतले व त्यांच्या मदतीने जखमी बंडू गांगुर्डे यांना सरकारी दवाखान्यात नेले. तेथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी जयेश रायबहादूर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.