गुजरातमधील सुरत येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ५० रुपयांसाठी मित्र हैवान बनल्याने एकाच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री पांडेसरा परिसरात फक्त ५० रुपयांच्या वादातून झालेल्या भांडणात एका २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टू सिंग अवधिया या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र तिरुपती सर्कलजवळील एका भोजनालयात जमले होते. याआधी ते अल्थन परिसरात गेले होते आणि वाढदिवसाच्या खर्चासाठी सर्वांनी एकत्र पैसे दिले होते. मात्र, जेव्हा ते भोजनालयात पोहोचले तेव्हा अनिल राजभर याने बिट्टूला दिलेले ५० रुपये परत मागितले आणि उत्सवात सहभागी होण्यास नकार दिला. एवढ्या छोट्या कारणावरून सुरू झालेला वाद झटपट तीव्र झाला.
वाद वाढत असताना अनिल आणि त्याचा मित्र भगतसिंग बिट्टूसोबत भिडले. या दरम्यान भगतसिंगने बिट्टूवर वाइपर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तो रॉड दुसऱ्या व्यक्तीला लागला. संतापलेल्या बिट्टूने तत्काळ चाकू काढून भगतसिंगच्या पाठीत वार केले. अनिलने मधे पडण्याचा प्रयत्न केला असता, बिट्टूच्या मित्र चंदन दुबेने त्याला धरून ठेवले. दरम्यान बिट्टूने चाकूने अनिलवर छाती आणि हातावर वार केले.
गंभीर जखमी भगतसिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर अनिल सध्या उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपी बिट्टू सिंग अवधिया आणि त्याचा साथीदार चंदन दुबे यांना अटक केली आहे.