राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आज म्हणजेच सोमवारी 1 जून रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज गर्दी केली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचं टेन्शन वाढलं असल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची फायनल यादी समोर येताच आता महायुतीमध्ये मोठी बंडखोरी उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेले अनेक दिवस महायुतीमध्ये विधान परिषद निडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. 17 पैकी तब्बल 14 विधान परिषद मतदारसंघात भाजपाचं बहुमत आहे. त्यामुळे भाजपानं 14 जागा लढवाव्यात असं भाजपमधील काही नेत्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने 6 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3 जागा हव्या होत्या. शेवटी चर्चेअंती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला सर्वाधिक 11 जागा शिवसेना शिंदे गटाला 4 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा मिळाल्या. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
जागा वटापाच्या फॉर्म्युल्यानंतर यवतमाळची जागा ही अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. मात्र यवतमाळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा महायुतीमधील दोन्ही पक्षांकडून बंडखोरी करण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी करत भाजपकडून नितीन भुतडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आदेश दिला म्हणून आपण अर्ज दाखल केला असा दावा यावेळी भुतडा यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी असं देखील म्हटलं आहे, की जर महायुतीत जागा शिवसेनेला सुटली असेल तर अमही युती धर्म पाळू. तर दुसरीकडे या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून साजिद बेग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.