बिहारच्या राजकारणात मोठा बदल ! बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार
बिहारच्या राजकारणात मोठा बदल ! बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार
img
वैष्णवी सांगळे
बिहारच्या राजकारणात मोठा बदल पहायला मिळणार आहे.  नितीश कुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर आता बिहारला पहिले भाजपाचे मुख्यमंत्री मिळणार आहेत. सम्राट चौधरी यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केला आहे. तर नितीश कुमार यांचे पुत्र, निशांत कुमार, उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. उद्या, १५ एप्रिल रोजी, सकाळी ११ वाजता लोक भवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल. निशांत कुमार आणि विजय चौधरी यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित आहे.

नितीश कुमार राज्यसभेवर निवडून आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री विराजमान होण्यासाठी सर्व तयारी सज्ज झाली आहे. नितीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यापासूनच संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या याद्या व्हायरल होऊ लागल्या होत्या. १९६२ साली तेव्हाच्या भारतीय जनसंघानं बिहारमध्ये पहिल्यांदाच तीन जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून भाजपा या राज्यात सातत्याने निवडणुकांचं राजकारण करत असली, तरी त्यात त्यांना कधी अपयश आलं, तर कधी यश येऊनदेखील मुख्य पदानं हुलकावणी दिली. आता मात्र नितीश कुमार राज्यसभेवर जात असताना बिहारमधल्या भाजपाच्या पहिल्यावहिल्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सम्राट चौधरी कोण आहेत?
सम्राट चौधरी यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६८ रोजी झाला. त्यांचा विवाह ममता कुमारी यांच्याशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शकुनी चौधरी आणि आईचे नाव पार्वती देवी आहे. सम्राट चौधरी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे वडील, शकुनी चौधरी, एक समाजवादी नेते मानले जातात. शकुनी चौधरी एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे जवळचे सहकारी होते. नंतर, शकुनी चौधरी यांनी आपली राजकीय दिशा बदलली आणि नितीश कुमार यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली.

सम्राट चौधरी यांना राजकारणाचा वारसा मिळाला. त्यांचे वडील, शकुनी चौधरी, हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. सम्राट चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी राजकारणाची मूलतत्त्वे लालू प्रसाद यादव यांच्याच शाळेत, म्हणजेच आरजेडीमध्ये शिकली, सध्या ते त्यांचे विरोधक आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आरजेडीमधून केली.

सम्राट चौधरी हे बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. उपमुख्यमंत्री म्हणून काम करून नंतर मुख्यमंत्री बनलेले ते बिहारमधील दुसरे नेते आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group