सरकारी नोकरीचा थाट काही वेगळाच! मुलीसाठी मुलगा बघताना खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणांपेक्षा सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणांना जास्त प्राधान्य दिले जाते. आणि इथेच अनेकांची फसवणूक होते. असाच एक प्रकार जळगाव मधून समोर आला आहे.
शासकीय नोकरी आणि लाल दिव्याची गाडी दाखवून एक तरुण तरुनींना शासकीय नोकरीत अधिकारी असल्याचा बनाव करत फोटो पाठवत होता. यात त्याने महिलांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे या तरुणाने लग्नासाठी एक दोन नाहीतर तब्बल सहा तरुणींची फसवणूक केली आहे.
जळगावच्या धरणगाव येथील निनाद कापुरे या तरुणाने आपण नायब तहसीलदार आहोत, क्लास वन अधिकारी आहोत, असे सांगून लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. निनाद कापुरे याने सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो तरुणींना पाठवले. तसेच दोन तरुणींकडून एकूण १५ लाख उकळून फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे. नाशिक व फलटणच्या तरुणींनी जळगावात पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. हे सर्व फोटो व पैशाचे पुरावे जळगावात पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत.
निनाद कपुरे याला फलटणच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. नाशिकच्या गुन्ह्यात अटक झालेली नाही. त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटून तरुणीने तक्रार केली आहे.
आरोपी निनाद कापुरे याने मेट्रोमोनिअल साईटवर प्रीमियम अकाउंट घेतले होते. त्यावरुन तो तरुणींची फसवणूक करत होता. खोटी प्रोफाइल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करत होता.