नवी दिल्ली : भारतीय समाजामध्ये विवाहाला अत्यंत महत्व आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने लग्नासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आवश्यक विधी पार न पाडता केलेला हिंदू विवाह वैध किंवा मान्य ठरु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पवित्रता याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.
कोर्टाने म्हटलं की, 'हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी (पवित्र अग्निभोवती सात फेरे मारणे) अशाप्रकारचे संस्कार आणि सोहळा केला जाणे आवश्यक आहे. या सोहळ्याला प्रमाण देखील आहे.' सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलं की, हिंदू विवाह हे एक संस्कार आहे. हे काही सॉन्ग डान्स, वायनिंग-डायनिंगचे आयोजन नाही.
हिंदू विवाह एक संस्कार असून भारतीय समाजात याला एक महान मूल्य गृहित धरुन उच्च दर्जा दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही तरुण आणि तरुणींना आग्रह करतो की त्यांनी विवाह संस्थेमध्ये प्रवेश करण्याआधी याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि भारतीय समाजातील ही संस्था किती पवित्र आहे याचा विचार करावा, असं न्यायमूर्ती बी नागरत्ना सुनावणीवेळी म्हणाले आहेत.
विवाह म्हणजे पुरुष आणि महिला यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा तो एक मार्ग आहे. भविष्यात तो अधिक विकसित होऊन कुटुंबामध्ये पती आणि पत्नीचा दर्जा घेतो असं कोर्टाने म्हटलं.