मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये बापाने मुलीला गोळ्या झाडून संपवल्याची घटना घडली आहे. कुटुंबाच्या मर्जीने लग्न करण्यास नकार दिल्याने बापाने मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. मुलीच्या लग्नाच्या चार दिवस आधीच घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , एका बापाने २० वर्षीय मुलीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. आदर्श नगरच्या महाराजपुरा येथील राहणाऱ्या मुलीचं चार दिवसांवर म्हणजे १८ जानेवारीला लग्न होतं. तनू असे या मुलीचे नाव आहे. घरात तनूच्या लग्नाची धावपळ सुरु होती.
मात्र, बापाने तिच्यावर मंगळवारी रात्री ९ वाजता गोळ्या झाडल्या. गोळी लागताच तनू जमिनीवर कोसळली. गोळी लागल्यानंतर तनूचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घरात तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिचा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला होता. तनूचा बाप हा हायवेजवळ ढाबा चालवतो.
या भयंकर घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. ग्वालियरचे एसपी धर्मवीर सिंह आणि सीएसपी महाराजपुरा घटनास्थळी पोहोचले. दोघेही घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीच्या बापाने हवेत पिस्तूल रोखली होती. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावर नियंत्रण मिळवलं. तनूने लग्नाला नकार दिला होता. कुटुंबीयांनी तिच्या मनाविरुद्ध लग्न जमवलं होतं.
आरोपी बापाला मुलीचा लग्नाला नकार देणे पसंत पडलं नाही. तनूला लग्न करण्याची इच्छा नव्हती. तनूने दोन दिवसांआधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने घरातील मंडळी बळजबरीने लग्न लावू देत आहेत, असे म्हणत होती. सध्या तो व्हिडिओ पोलिसांना मिळाला नाही.
या प्रकरणात मुलीचा चुलत भाऊ देखील सामील आहे. मुलीची लग्न करण्याची इच्छा नव्हती. यामुळे तिची हत्या करण्यात आली आहे. तनूच्या हत्येने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.