ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एकच्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवायांमधून तब्बल 3 कोटी 97 लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
या कारवाईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या इरफान अमानूल्लाह शेख आणि शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका डिलिव्हरी बॉयला ड्रग प्रकरणात अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी ड्रग्जविरुद्ध मोहिम सुरू केली होती आणि त्याअंतर्गत अनेक कारवाई करण्यात आल्या, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ड्रग्ज देण्यासाठी येत असलेल्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी सापळा रचत अटक केली.
ठाणे अंमली पदार्थ विरोधी कक्षाला गुप्त माहिती मिळाली होती की, मुंब्रा आणि शील डायघरजवळ एक डिलिव्हरी बॉय ड्रग देण्यासाठी येत आहे. या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून दोन किलोपेक्षा जास्त ड्रग जप्त केले. या ड्रग्जची किंमत जवळपास ४ कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पनवेलचा रहिवासी असलेला आरोपी इरफान अमानुल्ला शेख (वय ३६ वर्षे) हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो मुंब्रा येथे ड्रग्ज देण्यासाठी आला होता. तर दुसरा आरोपी शील डायघर शाहरुख मेवाशी उर्फ रिजवान (वय २८ वर्षे) हा मेकॅनिक म्हणून काम करतो. पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत कुणाला कुणाला ड्रग्ज पुरवले होते. तसंच आता त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले ४ कोटींची ड्रग्ज ते कुणाला विकण्यासाठी आले होते याचा शोध पोलिस घेत आहेत. अमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाची ही मोठी कारवाई आहे.