सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी हा जवळपास सर्वानाच माहित आहे. बॉलिवूडचे कलाकार असो किंवा अंबानी कुटुंब त्याचे फोटो प्रत्येकासोबतच आहे. याच ऑरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज घोटाळ्या प्रकरणी अँटि नारकोटिक्स सेलनं समन्स जारी केलं आहे.
मुंबई पोलिसांनी 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपीनं महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली, त्यानं सांगितलं की, तो भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्या पार्ट्यांना ड्रग्ज पुरवतो. या प्रकरणात आता ऑरीच नाव समोर आलंय.
दरम्यान, सध्या सिनेसृष्टीत ड्रग्ज प्रकरण गाजत असून बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी यात सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. अलिकडेच, मुंबई पोलिसांच्या अँटिकॉरिक्स सेलनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दुबईस्थित भागीदार सलीम डोला याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही त्यांची तस्करी केली.
मुंबई गुन्हे शाखेव्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय देखील या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहे. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडरिंग केले जात असल्याचा ईडीला संशय आहे. मुंबई गुन्हे शाखा लवकरच या सर्व व्यक्तींना समन्स बजावेल आणि त्यांचे जबाब नोंदवेल.