शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे शहर नशेच्या विळख्यात सापडल्याचे दिसते आहे.
ललित पाटील प्रकरणापासून हा प्रकार उघड होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना मिळाला आहे. आता सांस्कृतिक शहर असलेले पुणे शहर ड्रग्सचे केंद्र होऊ लागले आहे. मुळशी पॅटर्नमधील अभिनेते रमेश परदेशी उर्फ “पिट्या भाई” यांनी राज्याला हादरवणारा व्हिडिओ समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणेकरांसाठी वेताळ टेकडी शहरातील महत्वाचे स्थान आहे. ही टेकडी वाचवण्यासाठी पुणेकरांनी आंदोलने केली आहेत. अनेक जण फिरण्यासाठी वेताळ टेकडीवर नियमित येत असतात. परंतु आता या टेकडीवर जे चालले आहे, ते पाहिल्यावर पुणेकरांना धक्का बसला आहे. पुणेकरांची ही भावना अभिनेता रमेश परदेशी याने समोर आणली आहे. त्यांनी स्वतः हा व्हिडिओ अपलोड करत वेताळ टेकडीवरील धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.
परदेशी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स घेऊन नशेत बडबड करताना दिसत आहे. अभिनेते रमेश परदेशी म्हणतात, आम्ही वेताळ टेकडीवर पळायला आलो होतो. तर येथे महाविद्यालयात असणाऱ्या पहिल्या वर्षातील दोन तरुणी बिअर, दारु आणि नशेचे काहीतरी घेऊन कोपऱ्यात पडल्या होत्या.
काही तरुणांनी त्यांना उचलून आणले. आम्ही त्यांना रुग्णालयात नेत आहोत. परंतु एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? असा रोखठोक प्रश्न रमेश परदेशी यांनी विचारला आहे.
हा प्रकार पाहिल्यानंतर या प्रकारामुळे रमेश परदेशी यांच्या मनाला झालेल्या वेदनाही व्हिडिओतून दिसत आहेत.