तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष यांचे नाव या प्रकरणातील आरोपींच्या यादीत जोडले गेले आहे. धाराशिव येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात त्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी समोर आलेल्या ड्रग्स रॅकेटमध्ये विविध राजकीय व्यक्तींची नावे असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होती. आता या नावांमध्ये आणखी एका माजी नगराध्यक्षांचे नाव समोर आल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी न्यायालयात दाखल झालेल्या 10 हजार पानांच्या दोषारोपपत्रानुसार, या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या 36 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी अजूनही 22 आरोपी फरार असून, पोलिसांना केवळ 14 जणांना अटक करण्यात यश आलं आहे.
15 एप्रिलला दाखल केलेल्या दोषारोपपत्रातील माहिती
दोषारोपपत्रानुसार, ड्रग्स तस्करीत सामील असलेल्या प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाने बँक व्यवहारांची असून, आरोपींनी कोणासोबत आर्थिक व्यवहार केले याचा तपशील यात आहे. तसेच, आरोपींचा एकमेकांशी संपर्क कसा आला आणि ड्रग्स तस्करीची साखळी कशी तयार झाली, याचीही माहिती दोषारोपपत्रात देण्यात आली आहे. मुख्य आरोपी संगीता गोळे आणि इतर आरोपींचे संबंध, त्यांचे जबाब आणि सीडीआर डेटा देखील सादर करण्यात आला आहे. या तपासात मुंबई, सोलापूर आणि पुणे येथील तस्करी कनेक्शन उघड झाले असल्याचेही दोषारोपपत्रात नमूद आहे.
ड्रग्स प्रकरणात यापूर्वीही अनेक राजकीय मंडळींची नावे समोर
तुळजापूर येथील चंद्रकांत उर्फ बापू कने या माजी नगराध्यक्षाचाही या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश आहे. तर माजी नगराध्यक्षचे पती असलेले विनोद उर्फ पिंटू गंगणे ही आरोपी आहेत. शिवाय माजी सभापती सभापतींचा मुलगा आणि राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहेत. यात आता तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष यांच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. ड्रग्ज प्रकरणातील नावे असलेले हे राजकीय आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत.
आता या नव्या नावामुळे आरोपींची संख्या आणखी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस फरार असलेल्या 22 आरोपींचा शोध घेत असून, या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.