डोंबिवली : ब्राऊन शुगर विक्रेत्या महिलेकडून तरूणांसह विद्यार्थ्यांना ड्रग्जचा पुरवठा केला जातअसल्याची धक्कादायक माहिती अमोर आली आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेली कल्याण-डोबिवलीतील तरूणाई धोक्याच्या उंबरठ्यावर असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. कचोरे गावातील हनुमान नगर परिसरातून टिळकनगर पोलिसांनी ड्रग्ज माफिया वृद्धेला सापळा लावून बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , सलमाबेगम नूर मोहम्मद शेख (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.सलमाबेगमवर टिळकनगर पोलिसांनी महिनाभर गुप्त नजर ठेवली होती. ड्रॅग्जच्या साठ्यासह संपूर्ण माहिती मिळताच राहत असलेल्या परिसरात सापळा लावून सलमाबेगमला अटक करण्यात आली. तिच्याकडून 104 ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर जप्त केली.
कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात राहणारी 62 वर्षीय सलमाबेगम शेख ड्रग्ज विक्री करत असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. विद्यार्थी आणि तरुणांना हीच सलमाबेगम ड्रग्जची विक्री करत होती. 2015 मध्ये सलमा बेगमला याच टिळकनगर पोलिसांनी रंगेहाथ बेडा ठोकल्या होत्या. जेलमधून सुटल्यानंतर तिने पुन्हा हाच धंदा सुरू केला. दरम्यान सलमाबेगम हे ड्रॅग्ज कुठून आणत होती ? कुणाला विक्री करत होती ? याचा तपास टिळकनगर पोलिस करत आहेत.
पोलिसांनी असा रचला सापळा?
वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांनी या संदर्भातील माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पाेलिस आयुक्त सुनिल कुराडे यांना दिली. सलमाबेगमला रंगेहात पकडण्याकरिता पोलिसांचे स्वतंत्र पोलिस पथक नेमले गेले.पोलिस अधिकारी मोतीराम बगाड, अजित राजपूत आणि विनोद बच्छाव यांना सलमाबेगमवर पाळत ठेवण्याची जबाबदारी दिली. पोलिस त्याच परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत ठेवून होते. सलमा काय हालचाली करते ? तिला कोण भेटायला येतात ? याची संपूर्ण माहिती पोलिसांनी संकलित केल्यानंतर तिला रंगेहाथ पकडले. सलमाकडून 104 मार्फीन ड्र्ग्ज हस्तगत केले आहे. त्याची बाजारातील किंमत 5 लाख 50 हजार रुपये आहे. सलमा हिला ड्रग्ज कुणाकडून पुरविले जात होते ? कोणाकडून ते विकत घेत होती ? कोणत्या शाळा-कॉलेजमधील किती विद्यार्थ्यांना सलमा आणि तिच्या टोळीने लक्ष्य केले आहे ? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी टिळकनगर पोलिसांनी विशेष तपास सुरू केला आहे.