नवीन नाशिक (प्रतिनिधी) : प्रतिबंधित असलेला 27 ग्रॅम वजनाचा सुमारे 34 हजार रुपये किंमतीचा एम.डी. हा अमली पदार्थ वाहतुकीसह विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगणाऱ्या 5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिल कुऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, आरोपी मुस्ताक शौकतअली शेख उर्फ भुऱ्या (वय 30, रा. कामटवाडे, सिडको), मोहम्मद शोयब शकिल शेख (वय 20), रिजवान खुर्शीद खान (वय 33), शफीककुर रहमान मन्सुरी (वय 31) व मेराज सर्जाद कुरेशी (वय 28) चौघेही राहणार जाकीयहुसेननगर, नुरानी मस्जिदजवळ, गोवंडी पुर्व, मुंबई हे काल दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या एक्स्लो पॉईंटजवळील मैदानावर एम.डी. अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंबड पोलिसांना समजली.
त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी वाहनचालक मुश्ताक शेख, रिक्षाचालक मोहम्मद शेख तसेच रिजवान खान, शफीककुर मन्सुरी व मेराज कुरेशी हे पाच तरुण 27.5 ग्रॅम एम.डी. हा अपली पदार्थ वाहतूक करुन विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या स्वत:च्या कबजात बाळगताना संशयास्पद अवस्थेत मिळून आले.
यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 27.5 ग्रॅम एम.डी., 4 मोबाईल, एम.एच.04 एल.यु. 3464 या क्रमांकाची एक मोटारसायकल, एम.एच.03 डी.एस. 4389 या क्रमांकाची रिक्षा व 34 हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल या पाच तरुणांकडून हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहे.