कल्याण : कल्याण- डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नशेचा धंदा सुरू असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली होती. अशातच कल्याण - डोंबिवलीमध्ये नशेखोरांसह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
यात कल्याण डीसीपी स्कॉडने मागील २० दिवसात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ८ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. एमडी ड्रग्ज आणि गांजा तसेच कोडीनयुक्त बाटल्या मिळून ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेषतः महाविद्यालयीन तरुण, तरुणी नशेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून नशेचा धंदा करणाऱ्या तसेच नशेखोराविरोधात फास आवळण्यास सुरुवात करत कारवाई करण्यात येत आहे.
१३ तस्कर पोलिसांच्या ताब्यात
गेल्या महिनाभरापासून रात्री अपरात्री रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या, खुलेआम नशा करणाऱ्या नशेखोरा विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात देखील पोलिसांनी फास आवळला आहे.
कल्याण- डोंबिवली परिसरात गेल्या २० दिवसात अमली पदार्थ विकणाऱ्या तब्बल १३ तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाजारपेठ, कोळशेवाडी, विष्णूनगर पोलीस ठाणे, टिळक नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खडकपाडा आणि मानपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत.
डोंबिवलीमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आठ गुन्ह्यातून एकूण १३ तस्करांना अटक करण्यात आली आहे.
तसेच त्यांच्याकडून एमडी पावडर, कोडीनयुक्त बॉटल, गांजाचा साठा असा मिळून ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.