नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात भुरट्या चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशातच वडापाव खाणे नाशिकरोडच्या एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने तब्बल 48 हजार रुपये चोरून नेल्याची घटना भद्रकालीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की सुजाता एकनाथ सोनवणे (वय 40, रा. आढाव मळा, नाशिकरोड) या पतीसमवेत खरेदीसाठी शालिमार परिसरात आल्या होत्या. त्यावेळी बादशाही कॉर्नर येथे जय मल्हार वडापाव या ठिकाणी त्या वडापाव घेण्यासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांची नजर चुकवीत पर्समधील 48 हजार रुपये चोरून नेले.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार एन. एन. महाले करीत आहेत.