नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी जिल्हा परिषद नागपूर येथील शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे (प्राथमिक) व रोहिणी कुंभार (माध्यमिक) यांना अटक झालीय. या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली असली तरी मात्र, या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान पोलीस कोठडी नाकारणे हा पोलिसांना धक्का मानला जातोय. महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही या घोटाळ्याचे मुख्य आरोपी असून तिसरा मुख्य आरोपी निलेश वाघमारे गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे. तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. एसआयटीमार्फत करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
अटक केलेले हे दोन्ही आरोपीही यापूर्वी फरार होते. मात्र, रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी न देता थेट न्यायालयीन कोठडीत पाठवले.
या प्रकरणी पोलीस अधिकारी उच्च न्यायालयात पोलीस कोठडीसाठी पुन्हा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
प्राथमिक अहवालानुसार, रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे यांनी शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांच्या कार्यालयाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाले नसतानाही ऑनलाईन शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट शालार्थ आयडी तयार केले.
या बनावट आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून शासनाची 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, रोहिणी कुंभार यांनी 244 बोगस शालार्थ आयडी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तयार करून संबंधितांचे वेतन मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया राबवली, तर सिद्धेश्वर काळुसे याने 154 बोगस आयडी तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे.