नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : आश्रमात साफसफाईचे काम करणार्या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालून अश्लिल भाषेत बोलत तिचा एका साधूने विनयभंग केल्याची घटना अमृतधाम परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमृतधाम परिसरातील लक्ष्मीनगर येथे पुर्णेश्वर महादेव मंदिर येथे एका आश्रमात बालकदास गुरू हे साधू राहतात. या साधुकडे त्याच परिसरात राहणारी पिडीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी साफसफाईचे व धुणे भांड्यांचे काम करते.
जुलै 2025 पासून हा साधू पिडीत युवतीसमवेत अश्लिल वर्तन करायचा. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिने नकार देताच त्याने तिच्या चेहर्यावर अॅसिड टाकून तिचा चेहरा विद्रुप करण्याची धमकी तिला दिली. या प्रकाराला घाबरून पिडीतेने साधू विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात साधूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हा साधू फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.