नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अपहरण करून तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीसह त्याच्या मित्राने डान्स बारमध्ये बळजबरीने नाचकामास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही पंचवटी परिसरात राहते. आरोपी पवन व अक्षय यांनी संगनमत करून फिर्यादी महिलेस राहत्या घरी काही तरी गुंगीकारक औषध देऊन तिला गुलाम बनविण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले.
त्यानंतर तिला बेंगळुरू व सोलापूर या ठिकाणी नेऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढले व हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला शिवीगाळ व मारहाण केली, तसेच तिची इच्छा नसताना फिर्यादीला डान्सबारमध्ये बळजबरीने नाचकाम करण्यास भाग पाडले. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून दि. २१ जुलै २०२५ या कालावधीत घडला.
या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी पती व त्याच्या मित्राविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेमाणे करीत आहेत.