नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा : राज्य शासनाकडून विकास कामांसाठी
नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा : राज्य शासनाकडून विकास कामांसाठी
img
दैनिक भ्रमर



नाशिक : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांसाठी राज्य आणि केंद्र सरकार मिळून २५ हजार ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.



नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय आणि विविध विकासकामांना गती दिली असून राज्य शासनाकडून राज्य शासनाकडून विकास कामांसाठी ७ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.


नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणााऱ्या कुंभमेळ्यास आता २१ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. कुंभमेळ्यानिमित्त देशविदेशातील लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून प्राधिकरणाच्या माध्यमातून  विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करीत विकास कामे, पायाभूत सोयीसुविधांच्या कामांना चालना देण्यात येत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कुंभमेळ्यासाठी आवश्यक विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून २९७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांसाठी २ हजार ४५८ कोटी (एकूण १० कामे), राष्ट्रीय महामार्गाच्या २९४ किलोमीटरच्या ७ कामांसाठी ४ हजार ७४९ कोटी रुपये, आठ रेल्वे स्थानकांच्या ८६ कामांसाठी १ हजार ४७६ कोटी रुपये, नाशिकमधील राम काल पथसाठी ९९ कोटी १४ लाख रुपये, ओझर येथील विमानतळाच्या विकासासाठी ६४० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी पूर्वनियोजन करण्यात येत आहे.

राज्य शासनाने रस्ते विकासासाठी २ हजार २७० कोटी ६१ लाख रुपये आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांसाठी ५ हजार १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प, रस्ते, पूल, ओएफसी केबल, सीसीटीव्ही अग्निशमन आदी कामांसाठी ३ हजार १६ कोटी २० लाख रुपये, जलसंपदा विभागाला घाट बांधणे, बॅरेज, उपसा सिंचन योजनेसाठी ७५० कोटी ५४ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला मलनि:स्सारण प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १६५ कोटी ८८ लाख रुपये, वीज वितरण कंपनीला उपकेंद्र उभारणीसाठी ७३ कोटी ५० लाख रुपये, राज्य पुरातत्व विभागाला ४८ कोटी ७८ लाख रुपये, नाशिक येथे साधूग्रामच्या भूसंपादनासाठी एक हजार ५० कोटी रुपये, तर शिल्ल्क रक्कम ३५ कोटी ११ लाख रुपये असा पाच हजार १४० कोटी  रुपयांचा निधी राज्य शासनाकडून  प्राप्त झाला आहे. या कामांना गती देण्यात येत आहे.

याशिवाय राज्य सरकारकडून कुंभमेळ्याशी निगडित अन्य प्रकल्पासाठी ८ हजार २६३ कोटी १४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.  त्यात त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा २७५ कोटी रुपये, रामकाल पथसाठी ४६ कोटी १४ लाख रुपयांच्या कामाचा समावेश आहे.

तर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडच्या भूसंपादनासाठी ३ हजार ६५९ कोटी रुपये, तसेच विकासासाठी ४ हजार २८३  कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. कामाच्या आवश्यकतेनुसार आणि प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने उर्वरित निधी मंजूर करण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येत असून कामाचा वेग आणि गुणवत्तेबाबत अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी सर्व विभागांना मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. आयुक्त श्री.सिंग यांनीही कामांचा दैनंदिन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. कामे वेळेत पूर्ण होतील असे नियोजनही करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group